About Us


कलापीठा विषयी....


Rahul
संस्थापक अध्यक्ष

प्रा.श्री.राहूल गंगाधर आघाडे 
  [ एम.ए.(संगीत), बी.एड., संगीत विशारद (गायन व हार्मोनियम), संगीत अलंकार ] 

                    ओंकार संगीत विद्यालय व बहुउद्देशीय संस्था, औरंगाबाद संचलित भारतीय संगीत कलापीठ हे जागतिक दर्जाचे गुणी कलाकार व आदर्श बालकलाकार घडविण्यासाठी, संगीत शिक्षण, प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यासाठी आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन संपूर्ण विश्वाला दर्शविण्यासाठी सुपरिचित असून भारतातील अग्रगण्य संगीत प्रशिक्षण संस्थांपैकी एक आहे. तसेच भारतातील एकमेव संगीत कलापीठ आहे जे संगीत विषयासोबतच त्याचे शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकसंगीत, वारकरी संगीत व भजन या संगीत प्रकारावर विशेष कार्य करीत आहे. संगीत विषया सोबतच सामाजिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक अशा विविध क्षेत्रावरही अत्यंत गहन कार्य करत आहे. गरिब व अनाथ घरातील विद्यार्थ्यांना संपूर्ण मोफत संगीत शिक्षण देणारी व स्वत:च्या खर्चातून त्यांना वाद्यभेट देऊन त्याचे कलाविश्व सुरू करून परिपूर्ण अवस्थेत नेऊन त्यांना विविध स्तरावर नोकरी देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभा करून सन्मानपूर्वक आयुष्य देणारी एकमेव संस्था आहे. २ हजाराहून अधिक विदयार्थ्यांनी येथे शैक्षणिक अनुभव प्राप्त केला आहे.

                 सन २०१४ साली ओं.सं.वि. व बहुउद्देशीय संस्था, औरंगाबाद संचलित भारतीय संगीत कलापीठाची सुरूवात झाली. या विद्यालयात ज्ञान घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संगीत विषयक विविध परिक्षांसाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई ( मिरज ) यांनी  संगीत विद्यालयास संलंग्नता प्रदान करून २०२० पासून हे एक स्वतंत्र केंद्र व अस्तित्व बनले. ओं.सं.वि. व बहुउद्देशीय संस्था, औरंगाबाद संचलित भारतीय संगीत कलापीठ  "संस्था नोंदणी अधिनियम-१८६० (१८६० चा अधिनियम २१ नुसार)" योग्यरित्या महाराष्ट्र शासन नोंदणीकृत आहे. अनेक गुणीजन, दिग्गज, अभ्यासू कलाकार व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कलापीठातील प्रशिक्षण, शिक्षण, मार्गदर्शन  अत्यंत गहन आहे. कलापीठ हे एक संपूर्ण, व्यापक, काळजीपूर्वक व सर्वांगीण असे नियोजित अभ्यासक्रमावर आधारित आहे. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना सादरीकरण करणे आवश्यक आहे जे नंतर जनतेसमोर सादर केले जाते. या सर्व प्रक्रियेतून एक परिपूर्ण कलाकार म्हणून तो नावारूपास येतो. या सर्व प्रवासास आम्ही निरंतर प्रयत्नशील आहोत.


वारकरी संगीत varkari sangeet


'वारकरी संगीत परीक्षा अभ्यासक्रम' उपक्रमाविषयी.....
       
मनोगत ... 

          "भक्त आणि परमेश्वर या दोघांच्या भेटीच्या संगमातून वारकरी संगीताचा खळखळणारा झरा उगम पावला." शेकडो वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी पाया रचलेल्या वारकरी संप्रदायाच्या संगीत परंपरेत ' फड ' परंपरेचे फार मोठे योगदान आहे. त्याचप्रमाणे अनेक निष्ठावंत कलाकारही वारकरी संगीताची ज्योत आजही तेवत ठेवत आहे. वारकरी संगीत परंपरेतील गीतप्रकार आपली वेगवेगळी वैशिष्ट्ये जतन करून आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी 'ज्ञानेश्वरी' सारख्या महान ग्रंथातून ओवीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्याचप्रमाणे काकड आरती, दिंडी वाटचालीचे अभंग, नाटाचे अभंग, भारूड इ. अनेकविध प्रकारांनी वारकरी संगीताला साज चढविला आहे. वारकरी संप्रदायात संगीत भजन, चक्रीभजनही अत्यंत लोकप्रिय आहे. यामध्ये रागांचे प्रकार, तालांची विविधता, तिहाई, आलाप-ताना, चक्रधार हे प्रकार सादर करून वारकरी संगीतात वेगळीच गोडी निर्माण होते. मृदंग (पखावज), टाळ व वीणा हे वारकरी संगीतातील प्रमुख वाद्य असून या वादयातून ब्रम्हरसाची निर्मिती होते. वारकरी संगीतात गायकांप्रमाणेच वादकांचे स्थान ही अनन्यसाधारण असून मानाचे आहे . वारकरी संप्रदायात मृदंग वादन परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे .


वारकरी संगीत अभ्यासक्रमाची गरज.....


          शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संगीताचा सुसंगत अभ्यासक्रमाची रचना करून प्रमाणित करणारी संस्था आजतागायत उपलब्ध नव्हती. आजही इतर राज्यात शास्त्रीय संगीताव्यतिरिक्त त्या-त्या राज्यांतील विविध संगीत परंपरा / प्रकारांचे अभ्यासक्रम शासनामार्फत यथोचित चालू आहे. उदा . बंगालमधील रविंद्र संगीत . 
          याच उद्देशाने प्रेरित होऊन महाराष्ट्रात सर्वप्रथम व एकमेव  भारतीय संगीत कलापीठाद्वारे वारकरी संगीतावर आधारित सुलभ परीक्षा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. वारकरी संप्रदायातील नामवंत तसेच निष्ठावंत कलाकारांनी एकत्र येऊन या अभ्यासक्रमाची रचना केली आहे. २१ व्या शतकाकडे वाटचाल करणाऱ्या पिढीमध्ये शांती, समता, बंधुभाव, ज्ञान व भक्ती इ. घटकांचा विकास होण्यासाठी नव्या कल्पनांनी आकाशाला गवसणी घालणाऱ्या वारकरी संगीत शिक्षणाची आज खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे. 

लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष।
सेवू ब्रह्म रस आवडीने॥

उद्देश व फायदे - 

१) वारकरी संगीताचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या साधकास महाराष्ट्र शासन नोंदणीकृत कलापीठाद्वारे प्रमाणपत्र प्रदान करणे. 
२) सदरील प्रमाणपत्र हे महाराष्ट्र शासन नोंदणीकृत असल्याने विविध शासकीय/निमशासकीय योजनेसाठी अत्यंत परिणामकारक असेल.
३) अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संगीत भजन विशारद, मृदंग (वारकरी) विशारद ही पदविका व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते. 

अभ्यासक्रम व परीक्षेसंदर्भात सर्वसाधारण नियम -

१) कलापीठाच्या सर्व परीक्षा तोंडी असतील. कोणत्याही परीक्षेसाठी लेखी परीक्षा नाही. 
२) माहे जून मध्ये सदरील परीक्षा अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज उपलब्ध होईल.
३) कलापीठाचे परीक्षा केंद्र व संलग्नतेसाठी ९१५८२१२२१३ किंवा कार्यालयात संपर्क करावा. 
४) सदरील अभ्यासक्रम पूर्णतः वारकरी संगीतावर आधारित आहे. 
५) परीक्षेसंदर्भात सर्व सूचना www.omkarsangeet.org या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसारीत करण्यात येईल. 
६) थेट विशारद परीक्षा देण्यासाठी खालील अटींची पूर्तता आवश्यक :
      अ ) संगीत क्षेत्रातील मान्यताप्राप्त कलाकार किंवा पदवीप्राप्त गुरूंकडून शिक्षण घेतल्याचे शिफारसपत्र. 
       ब ) कलापीठाच्या मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी.Pages